राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरही गुन्हा दाखल
हिंगोली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हिंसाचार केल्याप्रकरणी परभणीत 50, तर हिंगोलीत 31 जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि एमआयएमचे विधानसभा उमेदवार अली खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन झाल्यापासून अली खान फरार आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याप्रकरणी झालेल्या आंदोलनप्रकरणी परभणीतील नवा मोंढा, कोतवाली, नानल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तिन्ही पोलीस ठाण्यात अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दंगल घडवणे, शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे, दगडफेक करणे इत्यादी कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ज्यांनी कायदा हाती घेतला त्यांच्यावर कारवाई होणारच, असे परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले. दुसरीकडे बीडमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. आज 31 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
आतापर्यंत या प्रकरणात 103 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींवर 307 अर्थात हत्या करण्याचा प्रयत्न असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
काल नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. मात्र काही लोकांनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बीडमधील आंदोलनाला गालबोट लागले होते.
कळमनुरीत 150 जणांवर गुन्हे दाखल
हिंगोलीतील कळमनुरी येथील दगडफेक प्रकरणी 150 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसटी बस, अग्निशमनदलाची गाडी, खासगी वाहने व दुकानावर दगडफेक आणि पोलिसांवर दगडफेक करून सरकारी मलमतेचे नुकसान आणि हिंसाचार केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळमनुरीमध्ये एसटी बस आणि खासगी वाहनांची जमावाने तोडफोड केली होती. या टोळक्यांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली आहे. त्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.