इस्लामाबाद – पुढील दोन महिन्यांत पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होणार असून दोन महिन्यांपूर्वीच त्याची घोषणा करण्यात आली होती. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी सुरू करण्यात आली असून निवडणुकीत नेमकी कोणत्या पक्षाची सरशी होणार याचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे.
त्यातून आलेले निष्कर्ष चकित करणारे आहेत. पाकिस्तानी न्यूज एआरवायने केलेल्या भाकितानुसार माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष बहुमताने सत्तेवर येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ अर्थात पीटीआय पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाकिस्तानात तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यात नवाज शरिफ यांचा मुस्लिम लीग, दिवगंत बेनझीर भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि इम्रान यांच्या पीटीआयचा समावेश आहे. भुट्टो यांच्या पक्षाची धुरा आता त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो सांभाळतात. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानात बरीच राजकीय उलथापालथ झाली असून त्यातून इम्रान खान यांना पदच्यूत करण्यात आले आहे.
सध्या ते तुरूंगात आहेत आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनाही तुरूंगात ठेवण्यात आले आहे. मात्र तरीही इम्रान यांची लोकप्रियता कमी झाली नसल्याचे अंदाज वर्तवले जात होते आणि या सर्वेक्षणातही त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. इम्रान केवळ पुन्हा सत्तेतच येणार नाहीत तर संपूर्ण बहुमताने सत्तेत येतील असा दावा एआरवायने केला आहे.
आगामी निवडणुकीत कोणता पक्ष बहुमताने सत्तेत येईल असा प्रश्न नागरिकांना विचारण्यात आला होता. त्यात ८४ टक्के लोकांनी इम्रान यांच्या पक्षाला पसंती दर्शवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवाज शरिफ यांचा पक्ष आहे मात्र त्यांना केवळ ११ टक्के पसंती दर्शवली आहे. केवळ ५ टक्के लोकांच्या पसंतीसह बिलावल भुट्टो यांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे.
जरी ही जनमत चाचणी किंवा मतदानपूर्व चाचणी असली तरी पाकिस्तानी जनतेला पुन्हा एकदा इम्रान खान यांनाच पंतप्रधान पदावर पाहण्याची इच्छा असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे म्हणता येऊ शकते. तसेच हे आकडे कुठेनाकुठे नवाज शरिफ आणि त्यांच्या आघाडीत सहभागी असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला अर्थात पीपीपीला धडकी भरवणारे आहेत.