मंगळवारी मतदान : रविवारी सायंकाळी झाली प्रचारसांगता
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात थेट सामन्यात चुरस
पुणे – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी झाली. या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी (दि.1) मतदान, तर मतमोजणी दि.3 डिसेंबरला होणार आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट निवडणूक पहिल्यांदाच होत असल्याने सर्व राजकीय पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहे. पश्चिम महाराष्ट्र या निवडणुकीसाठी मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी 35, तर पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पदवीधर मतदारसंघासाठी अरुण लाड, तर शिक्षक मतदारसंघाकडून कॉंग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर तर भाजपकडून पदवीधरसंघासाठी संग्राम देशमुख तर शिक्षक मतदारसंघासाठी जितेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहे. सर्व राजकीय पक्षांनी अधिकाधिक मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय तर ग्रामीण भागात तालुकास्तरावर सर्व राजकीय पक्षांनी बैठका घेऊन प्रचार केला.
सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात
पुणे विभागात पदवीधर मतदार संघात एकूण मतदार 4 लाख 26 हजार 257 आहेत. तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत. पदवीधरसाठी पुणे जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 611 मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 32 हजार 201 मतदार आहे. सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्ह्यातच असल्याने जिल्ह्यातील मते निर्णायक ठरणार आहे. पुणे पदवीधर मतदार संघासाठी विभागात एकूण मतदान केंद्रे 1 हजार 202 तर शिक्षक मतदार संघासाठी 367 मतदान केंद्रे आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी पुणे जिल्ह्यात 357 तर शिक्षक मतदारसंघासाठी 125 मतदान केंद्र आहेत.
मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
शिक्षक, पदवीधर निवडणूक मतदानासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे करण्यात येणार आहेत. पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारित 49 इमारतीत 152 मतदान केंद्रं आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात सोमवारी रात्री बारा वाजल्यानंतर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येणार आहेत.
मतदान प्रक्रिया संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. मतदान केंद्राच्या परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची वगळून अन्य दुकाने, उपहारगृहे, टपरी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. शिक्षक, पदवीधर मतदार निवडणुकीतील मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.