नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीच्यावेळी होणाऱ्या “नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाच्या आयोजनावरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. या कार्यक्रमासाठी खर्च होणारे 100 कोटी रुपये कोणते मंत्रालय खर्च करणार आहे, असा प्रश्न प्रियांका गांधींनी उपस्थित केला आहे.
अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियमवर हा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणून काम करणाऱ्या संस्थेवरही प्रियांका यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या कमिटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे, त्या कमिटीच्या सदस्यांनाच आपण या कमिटीचे सदस्य आहोत, हे देखील माहित नाही. या कमिटीला कोनत्या मंत्रालयाकडून पैसे दिले गेले आहेत, हे जाणण्याचा देशवासियांना हक्क नाही का?
प्रियांका गांधी यांनी ट्रम्प यांच्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाशी संबंधित हिंदी वर्तमानपत्राचे कात्रणही सोशल मिडीयावर शेअर केले आहे. “डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंद समिती’ असे या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या समितीचे नाव आहे.