Election Results 2023 – राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मात्र, त्या चार राज्यांत मुख्यमंत्री कोण बनणार याविषयीचा सस्पेन्स दुसऱ्या दिवशीही कायम राहिला.
मतदारांनी स्पष्ट कौल देताना तेलंगणाची सत्ता कॉंग्रेसकडे, तर इतर तिन्ही राज्यांची सत्ता भाजपकडे सोपवली. आता त्या राज्यांत स्पष्ट बहुमत असणाऱ्या सरकारांची स्थापना होईल.
मात्र, दोन्ही पक्षांनी संभाव्य मुख्यमंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहेत. त्यामुळे ते पक्ष मुख्यमंत्री निवडताना काही वेगळे प्रयोग करणार का याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांची निवड लांबली तर तर्क-वितर्कांना उधाण येईल. त्यातून नेतृत्वाच्या शर्यतीत असणाऱ्या नेत्यांविषयीच्या चर्चाही रंगतील.
तेलंगणात सरकार स्थापनेसाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची सोमवारी बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष ए.रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मात्र, तसे घडले नाही. मुख्यमंत्री निवडीचे सर्वांधिकार पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे रेड्डी यांच्याशिवाय इतर नावांवरही कॉंग्रेस श्रेष्ठी विचार करत असल्याचे संकेत मिळाले.
भाजपच्या गोटातूनही मुख्यमंत्र्यांच्या नावांविषयीची कुठली माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मध्यप्रदेशात भाजपला दमदार यश मिळाल्याने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पदावर कायम राहणार का याबाबत प्रचंड कुतूहल आहे.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना पुन्हा संधी मिळणार का, याचीही उत्सुकता आहे. मुख्यमंत्री निवडीबाबत भाजपमध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते. लवकरच त्या निवडीसाठी पक्ष केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.