दुबई -बेचाळीस वर्षीय गोलंदाजी प्रशिक्षक आणि श्रीलंकन क्रिकेट संघातील माजी खेळाडू नुवान झोयसावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सहा वर्षांची बंदी घातली आहे. प्रत्यक्ष खेळत असताना आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना झोयसाचे सट्टेबाजांशी असलेले लागेबांधे सिद्ध झाले असून त्याने सामने निकालनिश्चितीसाठी मोठमोठ्या रकमा आणि भेटवस्तू स्वीकारल्याचेही सिद्ध झाले आहे. झोयसावरील ही बंदी 31 ऑक्टोबर 2018 पासून ग्राह्य धरली जाईल.
श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या झोयसाने देशासाठी 30 कसोटी आणि 95 एकदिवसीय सामने खेळले आहेत. काही सामन्यांत चमकदार कामगिरी केल्यानंतर तो चर्चेत आला होता. मात्र, मोठी कारकीर्द घडवण्यापूर्वीच तो संघातून बाहेर झाला. मग वर्ष 2017 मध्ये श्रीलंका अ संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना टी-10 स्पर्धेमध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यावेळी त्याच्यावर वर्ष 2018 मध्ये सामन्यांचा निकाल निश्चित करण्याविषयी आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.
त्यावेळी तो एका भारतीय बुकीच्या संपर्कात आला होता. सदर बुकी आणि झोयसा यांच्यातील टेलिफोनीक संभाषण पडताळून पाहिल्यानंतर त्याच्यावरील आरोपांना बळकटी मिळाल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. श्रीलंकेच्या संघातील खेळाडूंनी त्यांच्या लौकीक आणि क्षमतेपेक्षा खालची कामगिरी केली, तर मॅच फीपेक्षा कितीतरी अधिक रक्कम मिळेल, असे आमिष झोयसाने दाखवले होते.
मात्र, पुढील कारकिर्दीचा विचार करता, झोयसाला सहकार्य करण्यास खेळाडूंनी नकार दिला आणि प्रकरण उजेडात आले. यापूर्वी दिलहारा लोकहुटीगे, सनथ जयसूर्या, जयनंदा वर्णवीरा या श्रीलंकन खेळाडूंना बंदीला सामोरे जावे लागले होते.