दिवाळीनंतरही पांढरे सोने घरात नाही…

अन्‌ बोंडे काळी पडली…

सततच्या पावसाने कपाशीची बोंडे कुजली आहेत. बोंडे सडून ती काळी पडली आहेत. बोंडांची मोठ्या प्रमाणावर गळती होत असून, कापसाची प्रत खालावली आहे. सततच्या पावसाने पिकावरील रोगराई वाढली आहे. परिणामी खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

नेवासा – दरवर्षी दसऱ्याला व दिवाळीला पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरात येते. यावर्षी पहिल्यांदा सतत एक महिना व नंतर परतीच्या पावसाने कापशी पिके धोक्‍यात येऊन पिवळी पडून निकामी झाली. त्यात मध्यंतरी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीची बोंडे फुटलीच नाहीत. परिणामी दिवाळी होऊन 10 दिवस उलटल्यानंतरही कापसाची आवक अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे.

राज्यात परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानाने खरीप हंगामातील सर्वांत मोठे व महत्त्वाचे पीक असलेल्या कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरवतीपासून कपाशीसाठी अनुकूल परिस्थिती होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीवरील महागडी खते, औषध व इतर बाबींवर दरवेळी पेक्षा दुप्पट ते तिप्पट खर्च केला आहे. पावसाने व वादळाने झालेल्या नुकसानीमुळे कपाशीचे उत्पदान कमी होणार असल्याने कपशी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. यावेळी कापशी नगदी पीक ठरेल, या आशेने शेतकऱ्यांनी कपाशी मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुरती दाणादाण उडाली आहे.

दरवर्षी दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरात 10 ते 15 क्विंटल कापूस पडलेला असतो. यावर्षी मात्र मागील महिनाभरात पाऊसच सुरू असल्याने कडक ऊन मात्र भेटले नाही. त्यामुळे कपाशी बोंडे अद्यापर्यंत फुटलीच नाहीत. परतीचा पाऊस ढगाळ वातावरण व रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर परिणाम होणार आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश काढले आहेत. मात्र नुकसान भरपाई कधी मिळणार ? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अनेक भागांत तर नोव्हेंबर महिना उजाडूनही कापशी वेचणीला सुरवात झाली. नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकरी करू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.