आरोग्य, पाणी, रस्ते, विजेला प्राधान्य : आ. डॉ. लहामटे

अकोले – अकोले तालुक्‍यातील सर्व प्रलंबित प्रश्नांना आपण हात घालणार असून, यानिमित्ताने आरोग्य, पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांकडे आपण निश्‍चितपणे लक्ष देऊ. तसेच मतदारसंघातील प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपण विकास आराखडा तयार करू, असे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मतदारसंघातील जनतेच्या भेटीगाठीमध्ये त्यांच्या प्रचंड अपेक्षांचे ओझे वाढले आहे. ते हलके करण्यास आपला उत्साह कायम ठेवू, अशी पुस्ती त्यांनी जोडली. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद, अन्य रस्ते, रस्तेदुरुस्ती यात आपण लक्ष घातले असून, खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी आपण बोललो आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जावा, असा आग्रह आपण महावितरण कंपनीकडे धरणा असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिवाय ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या यंत्रणा सध्या सलाईनवर आहेत. या व्यवस्थेला कृतिशील बनवणार आहोत, अशी त्यांनी माहिती दिली. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खेडोपाडी एसटी बस सुरू करणे, किमान मिनी बस सुरू करणे, अशी जास्त प्रमाणात मागणी आहे.त्यातही आपण लक्ष घालू. शिवाय रिक्त पदे भरण्यासाठी आपण आवाज उठवू. तसेच सर्व बाबींमध्ये तालुक्‍यातील जनतेला न्याय देण्यासाठी एक प्रारूप आराखडा आखू.

खड्डे बुजवणे, रस्ते दुरुस्त करणे, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे नियोजन करणे, हाताला रोजगार पर्यटनाच्या माध्यमातून मिळवून देणे, एमआयडीसी मंजूर करणे, आरोग्यविषयक यंत्रणा गतिमान करणे, जिल्हा उपरुग्णालयाची मागणी मार्गी लावणे, शिवाय तालुक्‍यातील विकासाची गुणवत्ता ही अधिक गुणवत्ता निकषात बसवून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आपण प्राधान्य देऊ. शिवाय दिवंगत ‘ठका बाबा गांगड म्युझियम उडदावणे’ येथे सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. देवगाव येथे राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याबरोबर चित्रमय प्रदर्शन उभे करणे, बिताका प्रकल्प मार्गी लावणे, तोलारखिंड रस्तामार्गी लावणे, याबाबत आपण लक्ष घालू, असे ते म्हणाले. विनय सावंत, बाजीराव दराडे, बाळासाहेब मालुंजकर, सुरेश खांडगे, मनसेचे दत्ता नवले, तालुका पंचायतीचे माजी सभापती दादापाटील वाकचौरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.