पुणे –करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सहा वर्षांपुढील आणि 12 वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासाठी केंद्राच्या पत्राची प्रतीक्षा असल्याचे राज्याचे मुख्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.
सहा वर्षांपुढील आणि 12 वर्षांच्या आतील मुलांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी “ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (डीसीजीआय) ने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आणि आरोग्य अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी घोषणा केली होती. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या.
वरील वयोगटातील लसीकरण सुरू करण्याला अद्याप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडून पत्र आले नाही. त्यांच्याकडून सर्व राज्यांना अधिकृतपणे पत्र पाठवले जाईल. त्यानंतर बालकांचे लसीकरण सुरू करणे इष्ट राहील. ते पत्र आल्यानंतर वरील वयोगटासाठी राज्यव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली जाईल, असे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले.
“डीसीजीआय’ ने आणीबाणीच्या परिस्थितीत भारत बायोटेकच्या “कोवॅक्सिन’ ला 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना वापरासाठी मान्यता दिली होती. तो वापरही मर्यादित स्वरूपात करण्यालाच परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर या 15 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिन आणि 12 ते 15 (च्या आतील) मुलांसाठी “कॉर्बेवॅक्स’ देण्याला परवानगी देण्यात आली. सध्या हे लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे.