Shivraj Singh Chauhan – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या राजकीय भवितव्याविषयी तर्क-वितर्क सुरू आहेत. अशात एका सोहळ्यात महिलांशी संवाद साधताना ते भावूक झाले. मेरी बहनों, ऐसा भैय्या तुम्हें मिलेगा नहीं. जब मैं चला जाऊंगा, तब तुम्हें याद आऊंगा, अशी टिप्पणी त्यांनी केली.
मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्या राज्यात शिवराज यांचा चेहरा पुढे न करता सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे समजते. त्यामुळे भाजपने सत्ता राखली तरी शिवराज यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले जाण्याची गॅरंटी नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर, शिवराज यांनी भावूक होऊन केलेल्या वक्तव्याचे महत्व वाढले आहे. मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यातील 79 उमेदवारांची नावे भाजपने आतापर्यंत जाहीर केली. मात्र, त्यामध्ये शिवराज यांच्या नावाचा समावेश नाही.
त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तरी उमेदवार म्हणून उतरवले जाणार का, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. डिसेंबर 2018 ते मार्च 2020 हा कॉंग्रेसच्या सत्तेचा कालावधी वगळता शिवराज 2005 या वर्षापासून मुख्यमंत्रिपद भुषवत आहेत.