नवी दिल्ली – व्हॉटसऍप हे सोशल मीडियातील सर्वात लोकप्रिय साधन आहे. या व्हॉटसऍपने आपल्या धोरणात अलीकडेच काहीं दुरूस्त्या केल्या आहेत. या दुरूस्त्या मान्य असणाऱ्यांनाच व्हॉट्सऍप वापरता येणार आहे. तथापि या दुरूस्त्यांबाबत ग्राहकांमध्ये मोठी चलबिचल सुरू आहे.
मात्र, या संबंधात खुलासा करताना व्हॉट्सऍपने म्हटले आहे की आमच्या धोरणांमध्ये आम्ही काहीं बदल केले असले तरी त्यातून ग्राहकांच्या माहिती व संदेशांविषयी आम्ही योग्य ती दक्षता घेतली आहे. त्या संदेशांचा किंवा माहितीचा दुरुपयोग होणार नाही आणि त्याचा अन्यत्र कोठेही प्रसार होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. या संदेशांची गुप्तता कायम राखली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
व्हॉट्सऍप आणि फेसबुक ही एकाच कंपनीची दोन प्रॉडक्ट आहेत. पण व्हॉट्सऍप ग्राहकाच्या कॉन्टॅकलिस्टचा किंवा ग्रुप डाटाचा फेसबुकसाठी वापर केला जात नाही किंवा ही माहिती फेसबुकशी शेअर केली जात नाहीं. ग्राहकांमध्ये होणारे संभाषण आमच्याकडून ऐकले जात नाही असेही व्हॉट्सऍपने स्पष्ट केले आहे.
व्हॉट्सऍपने आपल्या सेवा शर्थींमध्ये आणि प्रायव्हसी पॉलिसीमध्ये जे बदल केले आहेत ते मान्य आहेत असे सर्व व्हॉट्सऍप युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंत मान्य करायचे आहे. ते मान्य न करणाऱ्या ग्राहकांना ही सेवा वापरता येणार नाही. त्यावर इंटरनेटमधून मोठी टिका सध्या सुरू असून व्हॉट्सऍपच्या नवीन पॉलिसीचीही थट्टा केली जात आहे. तथापि ही सेवा अधिक फास्ट आणि विश्वासार्ह करण्यासाठीच हे धोरण बदल केले आहेत असे व्हॉट्सऍपने म्हटले आहे.