डॉ. मेघश्री दळवी
अलीकडेच वर्ल्ड वाइड वेबने तीस वर्षें पूर्ण केली. वर्ल्ड वाइड वेब ही कल्पना टिम
बर्नर्स-ली या ब्रिटिश शास्त्रज्ञांची. ते तेव्हा सर्नमध्ये, म्हणजे स्वित्झर्लंडमधल्या युरोपियन अणुसंशोधन केंद्रात काम करत होते. माहितीची वेगवेगळी पानं हायपरलिंक करायची आणि केवळ एका क्लिकवर उपलब्ध करायची या विचारातून वर्ल्ड वाइड वेबचा जन्म झाला.
आज आपण या वेबशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. चालू घडामोडींची माहिती, इतर संदर्भ, पुस्तकं-गाणी-चित्रपट-मनोरंजन, खेळांचं थेट प्रक्षेपण, जगाच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या, हे सगळं तिथेच होऊ लागलं आहे. ई-मेल, ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडिया, यात दिवस भराभर निघून जातो आहे. या वेबवर भले अनुभव येतात तसे बुरेही येतात. सोशल मीडियामुळे होणारे सामाजिक परिणाम म्हणा किंवा आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार, त्यामुळे ह्या वेबचं पुढे काय? असा प्रश्न अधूनमधून सर्वांना पडत असतो.
स्वत: टिम बर्नर्स-ली देखील यावर आपलं मत मांडत असतात. विशेषत: खोट्या बातम्या या माध्यमातून ज्या वेगाने पसरत जातात त्याने ते खूप व्यथित होतात. यासाठी मी नव्हतं हे उभं केलं, असं उद्वेगाने म्हणतात. मोठमोठ्या समुदायावर नजर ठेवणे आणि त्या समुदायाला आपल्या मताकडे वळवून घेणे यासाठी वेबचा वापर त्यांना भीतिदायक वाटतो. फेसबुकने आपल्या सदस्यांवर केलेले काही प्रयोग, अमेरिकन निवडणुकांमध्ये झालेले गैरप्रकार, अशा काही गोष्टींवर त्यांचा तीव्र आक्षेप आहे.
जगाची निम्मी लोकसंख्या आता ऑनलाइन असते. त्यामुळे इतक्या लोकांना माहिती पुरवताना वेबकडे अमर्याद शक्ती आलेली आहे. तिचा दुरुपयोग होऊ नये म्हणून टिम बर्नर्स-ली यांनी सॉलिड ही नवी संस्था सुरू केलेली आहे. त्यांना वेबला मोठमोठ्या कॉर्पोरेशन्सपासून दूर ठेवायचं आहे. ऑनलाइन वाचकांचा गैरफायदा कोणी घेणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
वेबच्या सामर्थ्याचा जगाला चांगला उपयोग व्हावा अशी बर्नर्स-ली यांना कळकळ आहे. त्यासाठी सॉलिडच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावेत, असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आज इंटरनेटचा वेग वाढला आहे आणि डेटा प्लॅन्स परवडणारे आहेत. त्यामुळे एखादी बातमी चटकन जगापुढे आणणे, उपयोगी माहिती सर्वांपर्यंत नेणे, आपल्या अनुभवांचा कोणाला ना कोणाला फायदा होईल या हेतूने अनुभव शेअर करणे यासाठी वेब खरोखरच उपयुक्त आहे. काही वेळा जनमत जागृत करणे, एखादी चळवळ उभारणे यात वेबचा सहभाग निश्चितच महत्त्वाचा ठरतो. सॉलिड ही संस्था हेच लावून धरणार आहे.
काही लोकांच्या हाती केंद्रित झालेल्या माहितीचं वेबने एक प्रकारे विकेंद्रीकरण केलं आहे. त्यामुळे लोकशाहीत जसे सर्वांना समान अधिकार अपेक्षित आहेत, तसेच माहितीबाबत सगळे समान हे तत्त्व वेबला लागू पडतं. अशा वेळी कोणी मुद्दाम चुकीची किंवा एकाच बाजूची माहिती मांडणे हे बर्नर्स-ली यांना पटत नाही आणि अनेक मोठमोठ्या संस्था किंवा जबाबदार व्यक्तीही या गोष्टीला पाठिंबा देताना दिसतात.
कोणत्याही तंत्रज्ञानाला काळी बाजू असू शकते, मात्र तिला बळी न पडता तिच्या स्वच्छ बाजूचाच पाठपुरावा करणं हे आता टिम बर्नर्स-ली यांचं लक्ष्य आहे.