पुणे – भामा आसखेड प्रकल्प : 11 कोटींची नुकसान भरपाई द्या

दिरंगाई होत असल्याने ठेकेदाराकडून मागणी

पुणे – शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या भामा आसखेड योजनेचे काम गेल्या चार वर्षांत सातवेळा बंद पडले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामात दिरंगाई होत असल्याने हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी महापालिकेकडे 11 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

एल ऍन्ड टी आणि आयपीडी या दोन कंपन्याकडे हे काम विभागून देण्यात आले आहे. शहराच्या पूर्व भागाच्या पाणी पुरवठ्यासाठी राबविण्यात येणारी सुमारे 374 कोटींची भामा आसखेड योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शहरासाठी या धरणातून सुमारे 42 किलो मीटरची स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेकडून हे काम सुरू करण्यात आल्यानंतर या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी या कामास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करावे त्यानंतरच काम सुरू करू देऊ असा पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून रडत खडत हे पुनर्वसनाचे काम सुरू असून मागण्या पूर्ण होत नसल्याने आतापर्यंत गेल्या चार वर्षांत सातवेळा काम बंद पडले असून त्यात जवळपास 2 वर्षे वाया गेली आहेत. त्यामुळे ठेकेदारांनाही आपलेही नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणण्यात आलेली मशीनरी तसेच नियुक्त केलेले मनुष्यबळ काम नसल्याने बसून असून त्याचा भार उचलावा लागत आहे. या शिवाय, प्रत्येक वर्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर 10 ते 15 टक्‍के वाढत असून कामास दिरंगाई होत असल्याने प्रस्तावित दरापेक्षा अधिक दाराने नुकसान सहन करत साहित्य खरेदी करावी लागत आहे. त्यातच, या कामाच्या दिरंगाई होण्यास आम्ही जबाबदार नसल्याचे सांगत, ही होणारी 11 कोटींची नुकसान भरपाई महापालिकेने भरून द्यावी, अशी मागणी या कंपन्यांनी केली आहे.

महापालिकेचीही झाली अडचण
या कंपन्यांना ही नुकसान भरपाई न दिल्यास तसेच आंदोलनामुळे कामाची वेळ वाढल्यास या कंपन्यांनी काम सोडण्याची तंबी महापालिकेस दिली आहे. त्यातच, आधीच प्रकल्पास दिरंगाई होत असल्याने प्रकल्पाचा खर्च दरदिवशी सरासरी 2 लाख रुपयांनी वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचीही चांगलीच कोंडी झाली असून यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे तसेच शासनाकडे तगादा लावण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.