वडापुरी – इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील बाबा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मेलद्वारे पत्र पाठवत राज्यपाल कोट्यातून कला क्षेत्रातील आमदारकीवर दावा केला होता. नुकतीच त्यांनी राज्यपाल कोश्यारी परळी वैजनाथ दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी मी मराठी वाहिन्यांवरती सुरू असलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये काम करत असून अनेक चित्रपटातही काम केले आहे, कृपया मला राज्यपाल कोट्यातून आमदारकी मिळावी अशी मागणी केली.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गायकवाड यांनी विधायक बनके क्या करोगे असा सवाल केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी नक्की विचार करा मला’ कलाक्षेत्रातील कलाकारांचे प्रश्न विधानभवनात मांडायचे आहेत असे उत्तर गायकवाड यांनी दिले. विशेष म्हणजे गायकवाड हे माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गावचे रहिवासी आहेत.
गायकवाड यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी मिळेल याची खात्री वाटत आहे. परंतु त्यासाठी मंत्रिमंडळाची शिफारस आवश्यक असते, ती शिफारस घेण्यासाठी गायकवाड यशस्वी ठरणार..? मंत्रिमंडळ बैठकीत बाबा गायकवाड यांच्या नावाचा विचार होणार..? येणारा काळचं यांचे उत्तर देणार आहे.
म्हणून केली मागणी
बाबा गायकवाड हे कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत रघु नावाची भूमिका निभावत आहेत. त्यांनी यापूर्वी कला क्षेत्रात काम केले आहे, महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असल्याने गायकवाड यांनी कला क्षेत्रातून संधी मिळावी यासाठी मागणी केली आहे.