नवी दिल्ली :- भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या मर्जीतील संजयकुमार सिंह उतरल्याने आंदोलनात सहभागी झालेल्या भारताच्या कुस्तीपटूंच्या कारकिर्दीलाच धोका उत्पन्न झाला आहे. त्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिम्पिक संघटना तसेच महासंघावर कार्यरत असलेली हंगामी समिती यांच्याशी चर्चा करण्यासाठी देशाचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया परदेशातील सराव अर्धवट सोडून तडकाफडकी भारतात परतला आहे.
महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांचे नातेवाईक तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती निवडणूक लढवणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता ब्रिजभूषण यांच्या मर्जीतील असलेले संजयकुमार रिंगणार उतरल्यामुळे कुस्तीपटूंच्या मनात धास्ती उत्पन्न झाली आहे. त्यांना निवडणुकीत उभे राहण्यापासून रोखण्याची मागणी आंदोलक कुस्तीपटूंनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, तरीही ते रिंगणात उतरल्यामुळे आंदोलनात सक्रिय असलेल्या अन्य सहकारी खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी बजरंग मायदेशी परतला आहे.
बजरंगने सरकारला इशारा दिला असून, केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पाळावे, असे आवाहन केले. ब्रिजभूषण यांच्या मर्जीतीलच व्यक्ती निवडणूक लढवत आहे. संजयकुमार सिंह भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. जर संजयकुमार निवडणूक जिंकले तर ही निवडणूक ब्रिजभूषण हेच जिंकल्यासारखे ठरणार आहे. सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते की जे कोण ब्रिजभूषण यांच्या जवळचे आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील आहेत त्यांना निवडणूक लढवण्यापासून मज्जाव केला जाईल. मात्र या प्रकरणात चित्र वेगळे दिसत आहे. सरकारने त्यांचे आश्वासन पाळावे, अन्यथा महिला कुस्तीपटू सुरक्षित राहणार नाहीत. महिला कुस्तीपटूंना पुन्हा एकदा दहशतीखालीच राहावे लागेल, असे बजरंग म्हणाला.
संजयसिंह हे उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे उपाध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण हे आपल्या मर्जीतील व्यक्तीला पदावर बसवून महासंघावरील आपले नियंत्रण पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिजभूषण यांनी आपल्या मर्जीतील उमेदवार देत निवडणुकीतून माघार न घेतल्याचेच संकेत दिले आहेत, असेही तो म्हणाला.
किर्गिस्तानवरून तडकाफडकी मायदेशी
बजरंग हा किर्गिस्तानमध्ये आगामी मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी सराव करत होता. मात्र, निवडणुकीचे चित्र समोर आल्यावर त्याने सराव सोडला व मायदेशी परतला. 2010 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या अनिता श्योरान या महासंघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. तसेच त्या ब्रिजभूषण यांच्याविरुद्धच्या खटल्यातील एक साक्षीदारही आहेत. त्यांच्याशी तसेच आंदोलनातील अन्य सहकारी साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्यासी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, असे बजरंगने म्हटले आहे.