नवी दिल्ली :- भारताची अव्वल महिला धावपटू दुती चंद डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने चार वर्षांची बंदी लावण्यात आली आहे. यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीच्या (नाडा) या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे दुतीने म्हटले आहे.
दुतीवरील बंदी 3 जानेवारी 2023 पासून लागू झाल्याचे नोंदले जाणार असल्याचेही नाडाने सांगितले आहे. दुतीने 2018 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 व 200 मीटरमध्ये सुवर्णपदके मिळवली होती. तसेच 2013 साली पुण्यात झालेल्या आशियाई विजेतेपद स्पर्धेत तिने ब्रॉंझपदक जिंकले होते. 2017 साली भुवनेश्वरमध्येही तिने याच पदकाची पुनरावृत्ती केली होती. तिने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 2016 साली रजतपदकावर मोहोर उमटवली होती.
गेल्या वर्षी राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीच्या (नाडा) अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी दुतीच्या रक्ताचे तसेच अन्य नमुने घेतले होते. तिच्या पहिल्या चाचणीत रक्तात तसेच युरिनमध्ये अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगेड्रोल ही राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (वाडा) बंदी घातलेल्या द्रव्यांचे अंश आढळून आले आहेत. दुसऱ्या चाचणीतही अँडारिन आणि ऑस्टारिनचे अंश आढळले आहेत.
निर्णयाला आव्हान देणार..
नाडाच्या चाचण्या तसेच वाडाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे दुतीने म्हटले आहे. यापूर्वी माझ्या जवळपास शंभर वेळा विविध स्पर्धांपूर्वी व स्पर्धांनंतरही चाचण्या झालेल्या आहेत. त्यात एकदाही मी अशी बंदी घातलेली द्रव्ये घेतल्याचे निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे यावेळीही मी खात्रीलायकरीत्या सांगू शकते की मी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळेच या बंदीच्या विरोधात मी दाद मागणार आहे व मला खात्री आहे की मी निर्दोष असल्याचेच सिद्ध होईल, असेही दुती म्हणाली.
भावना जाटही निलंबित…
नाडाच्या नियमानुसार ठावठिकाणा या नियमाचा तीन वेळा भंग केल्यामुळे भारताची चालणे स्पर्धेतील खेळाडू भावना जाट हिलाही जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेतून निलंबित करण्यात आले आहे. ही स्पर्धा हंगेरीतील बुडापेस्टमध्ये याच आठवड्यात सुरू होणार असून तेथे दाखल झालेल्या भावनाला आता मायदेशी परत पाठवले जाणार आहे.