न्यूझीलंडच्या विजयात ब्लॅकवुड-जोसेफचा अडथळा

एकाच दिवसात दोनदा सर्वबादची नामुष्की टळली

हॅमिल्टन, दि. 5 – पहिल्या डावात यजमान न्यूझीलंडने उभारलेल्या 7 बाद 517 धावांच्या डोंगरापुढे, आज खेळताना पाहुण्या वेस्ट इंडीजचा पहिला डाव 138 धावांत संपला. त्यानंतर 381 धावांच्या पिछाडीवरुन दुसरा डाव खेळताना वेस्ट इंडीजचा डाव 6 बाद 89 असा गडगडला होता. मात्र, त्यानंतर सातव्या विकेटसाठी जेर्मिन ब्लॅकवुड आणि अल्झारी जोसेफ यांनी 107 धावांची नाबाद भागिदारी करत, एकाच दिवसांत दोनदा सर्वबाद होण्याची नामुष्की टाळली. ब्लॅकवुड 80 तर जोसेफ 59 धावांवर नाबाद असून संघाच्या 6 बाद 196 धावा झाल्या आहेत. डावाचा पराभव टाळण्यासाठी अजूनही वेस्ट इंडीजला 185 धावांची गरज आहे.

दुसऱ्या दिवशीच्या नाबाद 49 धावांवरुन वेस्ट इंडीजने आपला पहिला डाव आज सुरु केला असता, एकामागून एक विकेट्‌स घेत न्यूझीलंडच्या टीम साऊदी (35 धावांत 4), कायले जेमिसन (25 धावांत 2) आणि नील वॅग्नेर (33 धावांत 2) यांनी वेस्ट इंडीजचा डाव 138 धावांत रोखला. यष्टीरक्षक शेन डाऊरिच जखमी असल्याने फलंदाजीस येऊ शकला नाही. विंडीजचे पाच जण दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत.

वेस्ट इंडीजचा दुसरा डावही असाच गडगडला. अवघ्या 21.3 षटकांत वेस्ट इंडीजच्या 6 विकेट्‌स घेत न्यूझीलंडने वादळ निर्माण केले. अवघ्या 89 धावांत सहा विकेट्‌स गेल्याने आणि यष्टीरक्षक फलंदाजीस येऊ शकणार नसल्याने तिसऱ्याच दिवशी सामना जिंकण्याच्या आशा यजमानांना निर्माण झाली होती.

मात्र, ब्लॅकवुड-जोसेफ जोडीने सावधपणे खेळ करत, प्रसंगी आक्रमक फटके लगावत, 111 चेंडूंत शतकी भागिदारी नोंदवली. ब्लॅकवुडने 98 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकार लगावत नाबाद 80 धावा केल्या. तर जोसेफने 73 चेंडूंत 9 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 59 धावा करत संघाची प्रतिष्ठा राखली. नील वॅग्नेरने 62 धावांत 2 विकेट्‌स घेतल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.