महापालिकेच्या बांधकाम विभागाची कारवाई सुरूच राहणार
विश्रांतवाडी – लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका जोत्यापर्यंतचे असे सुमारे साडेअकरा हजार चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यावेळी स्थानिक विमानतळ पोलीस ठाणे व महापालिकेकडील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लोहगांव परिसरात बहुमजली इमारतींची अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महापालिकेने ही अनधिकृत बांधकामे थांबविण्याच्या व केलेले बांधकाम काढून घेण्याबाबत जागामालकांना नोटीसाही दिल्या होत्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून बांधकामे सुरूच राहिल्याने पोलीस व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता किरण कलशेट्टी, कनिष्ठ अभियंता फारुख पटेल, दत्ता चव्हाण, निळकंठ शिलवंत यांच्या पथकाने केली.