पिंपरी – शिक्षणाची पंढरी, उद्योगनगरी, कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि कामगार करोनामुळे मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. जाताना त्यांनी भाड्याच्या राहत्या खोल्या व घरेही सोडली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात घर आणि खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर मात्र आता भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे.
शहराच्या विविध भागात मोठीमोठी विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये आहेत. हिंजवडी आणि तळवडे भागात आयटी कंपन्या आहेत. शहरात अनेक बड्या कंपन्यांसोबत लहान-मोठे हजारो उद्योग आहेत. या कंपन्यांवर अवलंबून अनेक मध्यम आणि लघु उद्योगही आहेत. यात काम करणारे बहुतांश विद्यार्थी अथवा कामगार भाड्याच्या घरात वास्तव्य करतात. शहरात दोन हजार रुपयांच्या सिंगल रुमपासून 30 हजार रुपयांपर्यंतचे बंगले भाड्याने उपलब्ध आहेत.
प्राधिकरण, संत तुकाराम नगर-पिंपरी, आकुर्डी, सांगवी, निगडी आदी परिसरात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तर थेरगाव, काळेवाडी, पिंपळे गुरव, रावेत, मोशी, चिखली आणि हिंजवडी भागांमध्ये आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते व कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार राहतात. लॉकडाऊनमध्ये अनेक आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षापर्यंत वर्क फ्रॉम होम दिले असल्याने बहुतेकजण गावी गेले आहेत.
सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून अनेकांनी जागा घेऊन घरे बांधली आहेत. तर काहींनी फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली आहे. याच मालमत्तेच्या भाड्यातून मिळणाऱ्या पैशांवर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे. चाकण, तळेगाव, भोसरी एमआयडीसी परिसरातही अनेकांनी दुमजली घरे बांधली असून स्वतः तळमजल्यावरील खोलीमध्ये राहून वरचे घर हे भाड्याने देऊन त्यामध्ये उदरनिर्वाह करण्यात येतो. मात्र, करोनामुळे विद्यार्थी व कामगार घरे व खोल्या रिकामे करून गावी गेले आहे. बाजारपेठेतील उलाढाल अपेक्षित न वाढल्याने एमआयडीसीतील कंपन्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाही.
करोनाची दुसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अद्यापही शाळा-महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. विद्यार्थी आपल्या मुळगावातून ऑनलाइन शिक्षण आहेत. शाळा सुरू न झाल्याने अनेक पालकांनीही गावीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये रिकामी झालेली घरे आणि खोल्यांना अजूनही भाडेकरु मिळत नाहीत. विशेष म्हणजे शहरातील परिसरामध्ये खोल्या भाड्याने देण्याच्या व्यवसायामध्ये वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. काही घरमालकांना महिन्याला एक लाखापर्यंत भाडे मिळत होते.
सोशल मीडियावर जाहिरातबाजी
स्वतः आणि दलालांच्या माध्यामातून प्रयत्न करूनही अनेक घरमालकांना भाडेकरू मिळत नाही. यामुळे अनेकांनी फेसबुक आणि व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून जाहिरातबाजी सुरू केली आहे. आपला फ्लॅट किती चांगला आहे हे दाखविण्यासाठी फोटोही सोशल मीडियावर टाकले जातात.