कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये दोन नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचा एक आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाची हत्या झाली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पानीहाती नगरपालिकेचे टीएमसी नगरसेवक अनुपम दत्ता यांची रविवारी संध्याकाळी पनिहाटीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
त्याचवेळी पुरुलिया जिल्ह्यातील झाल्डा नगरपालिकेत चार वेळा काँग्रेसचे नगरसेवक तपन कांडू यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या नागरी निवडणुकीत दोघांनी विजय मिळवला होता.
अनुपम यांच्या हत्येप्रकरणी टीएमसीने स्थानिक भाजप नेते आणि खासदार अर्जुन सिंह यांचा या हत्येमागे हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपने हा आरोप फेटाळला असून या हत्येमागे टीएमसीचा अंतर्गत कलह असल्याचे सांगण्यात आले आहे. तर काॅंग्रेसचे नगरसेवक तपन कांडू यांच्या हत्येचा टीमसीवर आरोप करण्यात आला आहे. टीमसीने हा आरोप फेटाळून लावला असून पोलिस खऱ्या हत्याऱ्याला शोधून काढतील असे टीएमसी नेते तपन राॅय यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. बराकपूरचे पोलिस आयुक्त मनोज वर्मा म्हणाले, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. आम्हाला काही पुरावे मिळाले आहेत. आम्ही त्यांची चौकशी करत आहोत.