कोलकता: कॉंग्रेसचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे वृद्धापकाळाने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि पुत्र असा परिवार आहे.
प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमुळे बंगालमधील प्रमुख नेत्यांच्या पंक्तीत मित्रा यांनी स्थान मिळवले. तब्बल सात वेळा ते बंगाल विधानसभेवर निवडून गेले.
एका कार्यकाळासाठी त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्वही केले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बनण्याचा मान त्यांना तीन वेळा मिळाला. मतभेदांमुळे मित्रा यांनी 2008 मध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी प्रगतीशील इंदिरा कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली.
मात्र, 2009 मधील लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये पक्ष विलीन केला. त्यावर्षी मित्रा तृणमूलचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. मात्र, त्यांनी 2014 मध्ये तृणमूलमधून बाहेर पडून कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश केला.
पश्चिम बंगालमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत (2016) कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची हातमिळवणी झाली. त्या आघाडीच्या प्रमुख शिल्पकारांमध्ये मित्रा यांचाही समावेश होता. सप्टेंबर 2018 मध्ये मित्रा यांनी तिसऱ्यांदा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.