- बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
- दुकानांचे शटर अर्धे उघडे
पिंपरी – साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा सण मंगळवारी (दि. 13) घरोघरी गुढी उभारून उत्साहात साजरा केला. सणानिमित्त नागरिकांनी खरेदीसाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवून आणि बंद शटरआड खरेदी-विक्रीचे व्यवहार केले.
गुढीपाडवा या सणापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. या सणाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. सणानिमित्त घरोघरी गुढी उभारण्यात आल्या होत्या. त्याशिवाय, गोडधोड जेवणाचे बेत करण्यात आले होते. सध्या करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता आबालवृद्धांनी या सणाचा आनंद घरात राहूनच घेतला. राज्यभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध जारी केले आहेत. जीवनावश्यक वस्तू विक्रीशिवाय अन्य दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नाकारलेली आहे. त्याशिवाय येत्या काही दिवसांतच राज्यभरात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्याची धास्ती घेऊन नागरिकांनी आज शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, दापोडी अशा विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू ठेवले होते. तर, काही दुकानदारांनी शटर लावून आतमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार केले.