मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज अखेर गुरुवारी मंजूर करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तो आर्थर रोड कारागृहातून बाहेर येऊ शकतो, असे मानले जात आहे. 26 दिवसांनी आर्यन घरी परतणार असल्याने शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी वांद्रे येथील किंग खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
मन्नतच्या बाहेरील फूटपाथवर प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी जमली आहे. आर्यनची तुरुंगातून सुटका झाल्याची बातमी मिळताच येथे चाहत्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी किंग खानही मुलाला घेण्यासाठी मन्नतच्या गेटवर पोहोचू शकतो.
प्रचंड गर्दीमुळे शुक्रवारी सकाळी मन्नत बाहेरील रस्ता बराच वेळ रोखून धरण्यात आला, त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्याच्या पथकाने लोकांना नियंत्रित केले. जसजसा दिवस सरत गेला तसतशी गर्दी थोडी कमी झाली आहे, पण मन्नतच्या बाहेर चाहत्यांची बरीच गर्दी आहे.
उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर न्यायालयाचा आदेश आज तुरुंगात पोहोचला. यानंतर आर्यन, मुनमुन धमिचा आणि अरबाज मर्चंटची तुरुंगातून सुटका होणार आहे. जामिनाची बातमी समजताच आर्यनचा चेहरा आनंदाने उजळला आहे. शाहरूखने तुरुंग कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. आर्यनची २१ वर्षीय बहीण सुहाना खानने तिच्या भावाच्या जामिनाची माहिती मिळताच तिच्या इंस्टाग्रामवर बालपणीचा एक फोटो पोस्ट केला. सुहानाने फोटो पोस्ट करून ‘आय लव्ह यू’ही लिहिले आहे.
दरम्यान, अभिनेत्री जुही चावलाने आर्यनसाठी जामीनपत्र भरले आहे. शाहरूख खान मन्नतवरून जेलकडे निघाला आहे. काही वेळात आर्यनला जेलबाहेर सोडण्यात येणार आहे.