मल्कनगिरी -ओडिशामध्ये सुरक्षा दलांनी विशेष मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा अड्डा उद्धवस्त केला. त्या अड्ड्यावरून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये ग्रेनेड, भूसुरंग, इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स आणि काडतुसांचा समावेश आहे. आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर सक्रिय असणाऱ्या नक्षलवाद्यांच्या अड्ड्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यावरून ओडिशाच्या मल्कानगिरी जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा जवान पोहचले.
त्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा आढळला. निष्पाप नागरिक आणि सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्याच्या उद्देशातून नक्षलवाद्यांनी तो साठा जमवल्याचे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले. संबंधित परिसरात नक्षलवादी दडले असल्याच्या शक्यतेने सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेत पोलिसांबरोबरच सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान सहभागी झाले आहेत.