वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – “तांत्रिक चुकांमुळे काही मालमत्तांना करआकारणी जास्त झाली असल्यास ती दुरुस्त करून देऊ. तसेच ती कमी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्यात येतील”, असे आश्वासन वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी दिले.
वडगाव नगरपंचायतीकडून काही नवीन वाढीव कर लागू करण्यात आल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे. काही नागरिकांनी बैठका घेऊन हे कर कमी करण्यासाठी नगरपंचायतीकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी नगरपंचायत कार्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते.
नगरपंचायत नियमानुसार, भांडवली मूल्याच्या आधारे व कमीत कमी दराने कर आकारणी करण्यात आली आहे, रहिवासी मालमत्तांना कमीत कमी तर व्यापारी मालमत्तांना थोडी जास्त कर आकारणी केली आहे. मात्र, चुकीची मोजणी, बांधकामाचा चुकीचा प्रकार, मोजणी न करता कर आकारणी आदी कारणांमुळे अनेक ग्राहकांना भरमसाठ कराची बिले आल्याचे नागरिकांनी डॉ, निकम यांच्या निदर्शनास आणून दिले.