मुंबई/ नवी दिल्ली – शिवसेना नाव वापरण्यास मनाई आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालय ते निवडणूक आयोग असा प्रवास लांबल्यानंतर अखेर आज बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले असून शिवसनेच्या दोन्ही गटांना आता स्वत:ची वेगळी ओळख अर्थात नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला त्यांनी सुचविलेल्या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह मिळाले असून त्यामुळे या पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या म्हणजे शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या महानाट्यानंतर राज्यात निर्माण झालेली अस्थिरता आणि निर्माण झालेले मळभ दूर होऊन आता आकाश मोकळे झाले आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मान्य केले असून त्यांनी सूचवलेले मशाल चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. तर त्यांचा विरोधी गट असलेल्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. मुख्यमंत्र्याच्या गटाला नक्की कोणते चिन्ह मिळणार हे उद्या म्हणजे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.
शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाल्यानंतर बोलताना या गटाचे नेते व राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही गुवाहाटी येथे असल्यापासून आम्हाला बाळासाहेबांचेच नाव हवे होते. ते मिळाले असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत. चिन्हाबाबत उद्या निर्णय होईल. तर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत व हा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचे यावरून दोन्ही गटांमध्ये प्रचंड संघर्ष सुरू असतानाच निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. शिंदे गटाकडून कर्णा, गदा आणि तलवार ही तीन चिन्हे आयोगाकडे पाठवण्यात आली होती.
आजच्या निर्णयानंतर बोलताना उद्धव गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की आम्ही पहिली लढाई जिंकली आहे. शिवसैनिकांनी आयुष्याच्या मशाली पेटवून पक्षाचे चिन्ह घराघरात पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले. काही लोकांनी काळरात्र निर्माण करण्याचे ठरवले. मात्र आता उष:काल सुरू झाला आहे. ही मशाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल असल्याचे आता दाखवून द्यायचे आहे असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, शिंदे गटाचे नरेश म्हस्के म्हणाले की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.