पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात कोयतेधारी टोळक्याने गैरसमजुतीतून केबल टाकणार्या तरुणावर हल्ला केल्याची घटना मध्यरात्री घडली. या टोळक्याने आरडाओरडा करत दहशत माजवली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी कोयत्याचा वापर करून हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील दोन घटनांत अल्पवयीन मुलांवरही वार करण्यात आले.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात प्रकाश राठोड (२१, रा. भोसरी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २८ मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ड्रॅगन चायनीजच्या समोर, अमेय अपार्टमेंट डीपी रोड औंध येथे घडली आहे.
फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र इंटरनेटचा पुरवठा करणार्या कंपनीत नोकरी करतात. औंधमधील डीपी रोडवर पहाटे साडेतीनच्या सुमारास ते केबल टाकण्याचे काम करत होते. त्या वेळी अचानक चौघेजण हातात कोयते घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत आले. फिर्यादींचा एक सहकारी केबल घेण्यासाठी जात असताना टोळक्याने त्याला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात व हातावर वार केले. त्यानंतर टोळके पसार झाले. या घटनेत तरुण जखमी झाला आहे. पोलिसांनी शोध घेऊन चौघांना पकडले असून, चौकशीत दोघे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. चौकशीत त्यांनी शिवीगाळ केल्याचा गैरसमज झाला. त्यातून हल्ला केल्याचे सांगितले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.
पेपर देऊन जाणाऱ्या तरुणावर वार
दहावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या तरुणाला शिवीगाळ करून हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. ही घटना मंगळवारी (दि. २६) दुपारी दीडच्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवरील कृष्णा सागर हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी कात्रजमधील संतोषनगर येथील १७ वर्षीय मुलाने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. १७ वर्षीय मुलगा दहावीचा पेपर सुटल्यानंतर घरी जात होता. त्या वेळी आरोपीने त्याला हाक मारून थांबवले. तुला खूप माज आलाय का, असे म्हणत शिवीगाळ केली आणि लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली, तर एकाने त्याच्या हातातील हत्याराने त्याच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. शहरात इतरही अनेक ठिकाणी दहावीचा पेपर सुटल्यावर मुलांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या. मात्र, याची काहींनी तक्रार दाखल केली नाही.
कात्रजला पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर वार
कात्रज भागात पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय मुलावर हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी १७ वर्षीय मुलाने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुलगा व त्याचा मित्र गप्पा मारत बसले होते.
तेव्हा त्याच्या मित्राचा पूर्वी झालेल्या वादातील आरोपी साथीदारासोबत आला. त्याने जुन्या वादातून शिवीगाळ केली. त्या वेळी फिर्यादीचा मित्र पळून गेला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली, तसेच शस्त्राने हातावर व पोटरीवर वार करून पळून गेले. तपास उपनिरीक्षक प्रियंका निकम करीत आहेत.
दुचाकीस्वारावर हत्याराने वार
कात्रज येथे दुचाकी स्लीप होऊन ती नर्सरीत घुसली. त्यामुळे नर्सरीतील कुंड्या फुटल्याने दोघांनी दुचाकीस्वाराला शिवीगाळ करून डोक्यात धारदार हत्याराने मारून गंभीर जखमी केले. ही घटना कात्रज येथील जैन मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर घडली.
याप्रकरणी काकासाहेब दत्तात्रय शिंदे (४२ रा. वाघजाईनगर रोड, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून सुनील बाळकृष्ण चव्हाण (५०) महेश सुनील चव्हाण (२७ रा. आनंद दरबारजवळ, दत्तनगर रोड, आंबेगाव खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
फिर्यादी त्यांच्या बुलेट गाडीवरून दत्तनगर चौकाकडून जैन मंदिराकडे जात होते. त्या वेळी त्यांची गाडी स्लीप झाल्याने समोर असलेल्या नर्सरीमध्ये घुसली. त्यामुळे नर्सरीतील कुंड्या फुटल्या. त्या रागातून आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घातला, तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करीत आहेत.