मुंबई – ईडीविरोधातील या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना टार्गेट केले जात आहे. आपण केंद्रीय यंत्रणांना उघड पाडल आहे, तुमच्या लढ्यात कॉंग्रेस खंबीरपणे उभी आहे, असे पत्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिहिले आहे. राहुल गांधींच्या पत्राबाबत संजय राऊतांनी ट्विट करत माहिती दिली.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले की, 8 फेब्रुवारी 2022 ला तुम्ही राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहिले, त्याची माहिती आम्हाला मिळाली. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या सहकाऱ्यांना टार्गेट करत असल्याचा मी निषेध करतो. मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची ही कृती लोकशाहीसाठी घातक आहे.
कॉंग्रेस तुमच्यासोबत नेहमीच आहे. तुमच्या अधिकाराचे आम्ही समर्थन करतो, असेही राहुल गांधी म्हणालेत. या पत्राबद्दल संजय राऊतांनीही राहुल गांधींचे आभार व्यक्त केले.
लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नात आम्हाला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय एजन्सी एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, हेसुद्धा आम्ही पार करू, असे संजय राऊत राहुल गांधींना उद्देशून म्हणाले.