सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावच्या शिवारातील दर्गणहळ्ळी रस्त्यावर शेतातील वस्तीवरील दोन कुटुंबीयांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
बाबू कल्लप्पा हिरजे (वय 65) या जागीच मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हा दरोडा बुधवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास पडला. दरोडेखोरांनी सुरुवातीला बाबू हिरजे यांच्या घरी दरोडा टाकला. यावेळी पती-पत्नी झोपेत होते.
दरोडेखोरांनी हिरजे यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दीड तोळ्याचे दागिने हिसकावून घेतले. यावेळी बाबू हिरजे यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने हल्ला केला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
यानंतर दरोडेखोरांनी जवळील पाटील यांच्या वस्तीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटील यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करत आरडाओरड केल्यामुळे दरोडेखोर पसार झाले. मात्र या झटापटीत पाटील गंभीर जखमी झाले.