बंगळुरू – कर्नाटकचे कायदामंत्री जे. सी. मधुस्वामी यांच्या एका फोन रेकॉर्डिंगची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही कर्नाटकात सरकार चालवत नसून ते केवळ संभाळत आहोत. पुढील सात-आठ महिने केवळ ओढून न्यायचे आहेत, कसेबसे हे सरकार चालले आहे असे विधान मधुस्वामी यांनी केल्याचे त्यात दिसत आहे. त्यांच्या या विधानांमुळे मुख्यमंत्री बोम्माई यांना मोठीच नामुष्की सोसावी लागत आहे.
स्वता मुख्यमंत्री बोम्माई यांनी कायदामंत्री मधुस्वामी यांनी ही विधाने केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण त्यांची ही विधाने वेगळ्या अर्थाने घेतली जात आहेत अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सर्व व्यवस्थीत चालले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कर्नाटकात मुख्यमंत्र्यांना बदलले जाणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री मात्र सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
मधुस्वामी आणि एक सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील एका फोन संभाषणाची ही ऑडिओ क्लीप आहे. ती व्हायरल झाल्यानंतर भाजपचेच एक मंत्री मुनीरत्ना यांनी मधुस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने हा पेच आणखी गंभीर बनला आहे. सहकार मंत्री सोमशेखर यांनीही मधुस्वामी यांच्यावर जाहीर टीका केली आहे. आता मधुस्वामींना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी जोर धरीत आहे.