प्रेरणा: पाणीदार माणूस- आनंद मल्लीगेवद

दत्तात्रय आंबुलकर

बंगळुरूमधील पाण्याची पातळी खाली जात आहे. अशावेळी काही स्थानिक युवक बंगळुरूला पुन्हा “जलयुक्‍त’ करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करीत असून या प्रयत्नशील व कल्पक युवकांमध्ये एक मुख्य नाव आहे बंगळुरूच्या आनंद मल्लीगेवद यांचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतिहासाचा ताजा मागोवा घेतल्यास असे स्पष्ट होते की 1980 च्या दशकात बंगळुरू महानगरात असणाऱ्या पाणवठे-तलावांची संख्या 300 होती. आज हीच संख्या कागदोपत्री असणाऱ्या नाममात्र तलावांसह केवळ 180 वर आली आहे. अगदी नजीकच्या काळात म्हणजेच 2014 पासून बंगळुरूचे 5 मोठे तलाव इतिहासजमा झाले आहेत. परिणामी आज बंगळुरू महानगरात खऱ्या अर्थाने मोठ्या व पाणीदार तळ्यांची संख्या 34 असून याचा अपरिहार्य परिणाम बंगळुरूवासीयांच्या तोंडचे पाणी पळण्यात झाला आहे.

आज बंगळुरू व महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा होता 100 किलोमीटरवरील कावेरी नदीतून. आता हे पाणी अर्थातच अपुरे पडू लागल्याने कर्नाटक सरकारने राज्यातील नद्या व दूरवरच्या धरणांमधून पाणी आणण्यासाठी उशिरा का होईना पण प्रयत्न तर सुरू केले, मात्र त्याचवेळी बंगळुरूमधील जुन्या व परंपरागत तलावांकडे लक्ष देऊन त्यांचे पुनरुज्जीवन करण्याकडे मात्र सातत्याने दुर्लक्षच होत गेले व त्यामुळे शहरातील पाण्याचे दुर्भिक्ष व पिण्याच्या पाण्याची समस्या वाढतच गेली आहे.

या पार्श्‍वभूमीवर 2016 मध्ये आनंद मल्लीगेवद या तरुणाने महानगर बंगळुरूच्या अनेकल तालुक्‍यातील व्यालासंखल्ली तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा निश्‍चय करून त्यानुसार प्रयत्न सुरू केले. व्यालासंखल्ली तलावाचा तपशील म्हणजे 36 एकराच्या प्रदीर्घ क्षेत्रात कधी पाण्याने भरलेल्या असणाऱ्या या तलाव क्षेत्रात वर्षानुवर्षे जवळच्या परिसरातील कचरा घाण, खराब वस्तू, राडारोडा इ. टाकण्यात येत असल्याने पाण्यातून चिखल-घाण व त्यानंतर बिनपाण्याच्या जमिनीमध्ये कधी बदल झाला हे सर्वांसमक्ष होऊन पण कुणालाच कळले नाही. मात्र, आनंदने त्यावर तोडगा काढण्यात पुढाकार घेतला.

आनंद मल्लीगेवद याची वैयक्‍तिक पार्श्‍वभूमी म्हणजे आनंद शिक्षण व व्यवसायाने संगणक इंजिनिअर. त्याचे मूळ गाव कोप्पल. मात्र शिक्षण व नोकरीसाठी इतर अनेकांप्रमाणे तो बंगळुरूला आला. आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठे काम-नाव पण कमावले. मात्र पाण्याच्या प्रश्‍नाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपल्या सुस्थापित व आकर्षक पगाराची नोकरी सोडून तलावाच्या पुनरुत्थानाचे काम सुरू केले.

आपल्या तलाव पुनरुत्थानाच्या पहिल्या प्रयत्नात यश आल्याने उत्साहित झालेल्या आनंदने आता बंगळुरूच्या तलावांना पुन्हा पाणीदार करणे हेच आता आपले जीवन उद्दिष्ट ठरवून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले. आज व्यालासंखल्ली या “मृत’ तलावातील पाण्याची पातळी 15 फुटांहून अधिक झाली आहे हे विशेष.

आता आपल्या यशस्वी प्रयत्नांच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरू शहरात दुर्लक्षित व आज पाण्याविना असणाऱ्या तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी आपल्या प्रयत्नांना आनंदने तळ्याकाठच्या स्थानिक लोकांना सक्रियपणे सहभागी करून आपल्या प्रयत्नांनाच नव्हे तर पाणीदार पुढाकाराला पण प्रासंगिक आयाम दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)