पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण 3.82 टीएमसी म्हणजे 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान चांगल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पात दोन दिवसांत एक टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
पाऊस लांबणीवर पडल्याने खडकवासला प्रकल्पातील चार धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार कायम होती. दरम्यान मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगल्या स्वरुपाचा पाऊस होत असल्याने ओढ्या-नाल्यांद्वारे धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मंगळवारी वरसगाव धरणात 13 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर टेमघरमध्ये 5 मिमी, पानशेतमध्ये 9मिमी आणि खडकवासला प्रकल्पात 3 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्यस्थितीत टेमघर धरणात 0.01 टीएमसी, वरसगावमध्ये 1.07 टीएमसी, पानशेतमध्ये 2.09 टीएमसी आणि धरणात 0.64 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.