भाटघर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

भाटघर – भाटघर धरण क्षेत्र परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जून महिन्यामध्ये 134 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन टक्‍कांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत 6.55 टक्‍के एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती भाटघर प्रशासनाने दिली आहे.

यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने उशीरा हजेरी लावली. जूनच्या सुरुवातीस पडणारा मान्सूनपूर्व पावसाने जूनअखेरीस हजेरी लावली. यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. भोर परिसरात मुख्य पीक भात असून खरीप हंगामात भुईमूग, सोयाबीन, चवळी, घेवडा ही पिके घेतली जातात. मान्सूनपूर्व पावसाने उशीरा हजेरी लावल्याने या पिकांची पेरणी खोळंबली आहे.

भाटघर धरण वेळवंडी नदीवर बांधले असून 23.75 टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरणाच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व पूर्व भागातील शेती सिंचनासाठी केला जातो. गेल्यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. तर एक जुलैला मान्सून पावसाने हजेरी लावली होती. सलग सव्वादोन महिने पावसाने विश्रांती घेतली नसल्यामुळे धरण शंभर टक्के भरले होते. गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने काही भागात भातपिके पाण्याविना जळाली होती. तर काही भागात तुडतुडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भात पिकाच्या उत्पादनात घट झाली होती. यावर्षी तरी मेघराजाने आमच्यावर कृपा करावी, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.