वाघोली – वाघोली साठी भामा-आसखेडचे पाणी मिळावे अशी मागणी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार अशोक पवार यांनी वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली.
वाघोलीसाठी भामा-आसखेडचे पाणी मिळावे, वाघोलीतील झोपडपट्टीधारकांना S.R.A. मार्फत पक्की घरे मिळावीत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा समावेश पुणे महानगरपालिकेत लवकरात लवकर करण्यात यावा, वाघोलीत महानगरपालिका अंतर्गत लसीकरण सुरू करण्यात यावे, वाघोली अंतर्गत जकात नाका ते कटकेवाडी १०० फुटी डी.पी. रस्त्याला गती देण्यात यावी, पी.एम.सी. चे क्षेत्रीय कार्यालय वाघोली मध्ये सुरू करण्यात यावे, वाघोली ग्रामपंचायतीच्या मार्फत मंजूर कामांना गती देण्यात यावी, घनकचरा व्यवस्थापन करण्यात यावे इत्यादी मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. आयुक्तांनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात-लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी हडपसरचे आमदार चेतन तुपे , माजी सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव (गवळी) आदी मान्यवर उपस्थित होते.