जवळार्जुन – पुरंदर तालुक्यातील धालेवाडी केंद्रातंर्गत कोथळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूपडे बदलत आहे. शाळेचा परिसर सुशोभित तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने शाळेच्या वरांड्यात, भिंतींवर शिक्षकांनी स्वतःच चित्रकलेचा वापर करीत वारली संस्कृती साकारली.
जिल्ह्यात इंग्रजी माध्यमातील शाळा प्रवेशांचा कल यंदा बदललेला आहे. यंदा इंग्रजी शाळेचा निरोप घेत विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळले आहेत. तालुक्यामध्ये 125 विद्यार्थी झेडपी शाळेत दाखल झाले आहेत. कोथळे शाळेत एकूण 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक गोविंद लाखे, सहशिक्षक विकास भोसले हे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, पालक व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शाळा डिजिटलकडे वाटचाल करीत आहेत.
शासकीय यंत्रणेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होत असल्याने शिक्षकांना कामात हुरूप येत आहेत. सुसज्ज इमारत,संरक्षण भिंत, शाळेत वीज, पाणी, शौचालय, संगणक कक्ष, डिजिटल टीव्ही, वाचनालय, आकर्षक बाग, विविध खेळण्याचे साहित्य, शाळेसमोर मोठे मैदान असल्याने गुणवत्तेबरोबरच सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांना विविध संस्कृती व परंपरेची माहिती व्हावी, यासाठी शिक्षकांनी स्वतः हातात ब्रश, रंग घेऊन वारली संस्कृतीची चित्रे साकारली आहेत.
आदिम काळापासून मानवाने कलांना आपलेसे केले आहे. संस्कृती, रूढी, परंपरा, जीवनशैली, उत्सव, सण, लग्नसोहळ्याचे दर्शन कलेच्या माध्यमातून समाजमनावर कायम कोरला आहे. ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यातील तालासरी, डहाणू, पालघर, वसई वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा भागात आदिवासी वारली संस्कृती आहे.
वारलीच्या रेखाटनात झोपडीची भिंत प्रामुख्याने दर्शनी भागात आहे. तराफेची सर्वाधिक चित्रे, चौकोनी, त्रिकोणी, वर्तुळ आकारांचा वापर केल्याने चित्रांचे सौंदर्य वाढवले आहे. गटविकास अधिकारी अमर माने, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत उगले,विस्ताराधिकारी पांडुरंग मेमाणे, केंद्रप्रमुख उज्ज्वला नाझरेकर, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. त्यांचे समाजपूर्वक आकलन मुलांना होते. त्यामुळे गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता झपाट्याने वाढत आहे. आता इंग्रजी शाळेतील मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल होत आहेत.
– प्रमोद जगताप, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, कोथळे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शेतकरी, कष्टकरी, गोरगरीबांची मुले शिक्षण घेतात, असे नाही. समाजातील राजकीय, सामाजिक आर्थिकदृष्ट्या सबल पालकांची मुले ही आता जिल्हा परिषदेचे शाळेत प्रवेश घेत आहेत. गटातील जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांची मुले ही झेडपी शाळेत शिक्षण घेत आहेत.
– गोविंद लाखे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोथळे.