मुंबई – बिग बॉस फेम अभिनेते किरण माने नेहमीच विविध मुद्यांवर सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. नुकतेच त्यांनी एक वारकरी वेशामध्ये असलेल्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
किरण मानेंची पोस्ट
“‘वारी’ ही लै लै लै नादखुळा गोष्ट हाय. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तन परंपरा सुरू केली नाय. माणसामाणसांतले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो. याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा!
संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लीम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात. मुस्लीम बांधवांकडून आपल्या वारकर्यांना जेवण दिलं जातं.
विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही ‘अदा’ होतं! ज्यावेळी मुस्लीम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करतात!! एरवी सहज दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मजारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येत्यात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना कायतरी ‘मेसेज’ द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे.
ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हा विचार नामदेव, तुकोबारायांपासून आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला…तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यंत आणली. ती फुकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर ‘आपलंच’ डोकं हाय…”
View this post on Instagram
किरणे माने यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यातून त्यांनी हिंदू-मुस्लिम बांधवाच्या ऐक्याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, किरण माने लवकरच ‘रावरंभा’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.