पुणे/मुंबई – मुंबईतील बहुप्रतीक्षित असा “मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक’ पूल पुढील महिन्यांत नागरिकांसाठी खुला होणार आहे. डिसेंबर महिन्यात नाताळाच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होण्यासह पुणे (लोणावळा) ते मुंबई प्रवास अवघ्या 90 मिनिटांत करता येऊ शकेल.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवासाला होणारा विलंब यापार्श्वभूमीवर हा पूल वेळीची बचत करणारा ठरणार आहे. “मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक’ हा समुद्रावर उभारण्यात आला आहे. हा पूल 22 कि.मी. लांब आहे. पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झालेले आहे. 22 कि.मी. पैकी 16 कि.मी.पर्यंतचा भाग समुद्रावर बांधण्यात आला आहे. एमटीएचएल पूल सुरू झाल्यानंतर मुंबईहून-नवी मुंबईपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीपासूनही सुटका होणार यामुळं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक पूल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिरलेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. एमटीएचएल पुल सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणेपर्यंतचा प्रवासही सोपा आणि वेगवान होणार. लोणावळा-खंडाळा आणि मुंबईपर्यंतचा प्रवास 90 मिनिटांत होण्याची शक्यता आहे.
पुण्याला जाण्याचा मार्ग…
पी.डी. मेलो रोडवरून फ्री-वे त्यानंतर सायन-पनवेल द्रुतगती मार्ग आणि मग तुम्ही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करता. यापुढे तुम्ही गोव्याकडेही प्रवास करू शकता. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 748 असे दोन मार्ग लागतात. पी डी. मेलो रोडवरून फ्रीवे त्यानंतर (शिवडीच्या पुढे बाहेर पडावं लागणार), नंतर तुम्ही मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकवरून पुढे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर चिर्ले मार्गाने प्रवास कराल. पुढे हा मार्ग गोव्यापर्यंत जाणार आहे.
ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये…
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी 18 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. देशातील सर्वात लांब समुद्री पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 16.5 किमी लांब डेक असलेला हा भारतातील पहिला पूल असणार आहे. पुलाचा सर्वात मोठा हिस्सा समुद्रावर असल्याने आपत्कालीन मदत लवकर मिळावी या हेतूने योजना बनवण्यात आली आहे.