पाच ठिकाणी केंद्र
पुणे – सर्वसामान्य नागरिक, कॉर्पोरेट-आयटी कंपन्या तसेच व्यावसायिक आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी “वॉक इन टेस्ट’ केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. येथे फक्त 500 ते 550 रुपयांत ही चाचणी होईल. पालिकेच्या पाच परिमंडळनिहाय चाचणी केंद्र सुरू केली जाणार आहेत. यासाठी कर्मचारी नियुक्ती तसेच जागा निश्चिती सुरू आहे.
शहरात करोनाच्या नव्या बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, त्यांच्या संपर्कातील सर्वांच्या महापालिकेकडून करोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यातही आता रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, या केंद्रांवर सध्या केवळ लक्षणे असलेल्या तसेच ट्रेसिंगमध्ये सापडलेल्या नागरिकांच्याच चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, खासगी आस्थापना-कंपन्या तसेच अनेक नागरिकांत लक्षणे नसली, तरी व्यवसाय तसेच कामानिमित्त ते बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांचीही चाचणी करावी, अशी मागणी केली जात आहे. अशा व्यक्तींच्या करोना चाचण्या करण्यासाठी “वॉक इन टेस्ट’ या संकल्पनेअंतर्गत ही पाच केंद्र सुरू केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात या केंद्रांवर दररोज 100 ते 150 चाचण्या होतील. यानंतर मागणीनुसार ही संख्या वाढवली जाईल. या चाचणीसाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे खासगी लॅबकडून होणाऱ्या आर्थिक लुटीतूनही पुणेकरांची सुटका होणार आहे.
व्यापाऱ्यांसाठीही केंद्र
शहरातील व्यापारी आणि त्यांच्या कामगारांच्या तपासणीसाठी व्यापारी पेठा असलेल्या मध्यवर्ती भागातही रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यासाठीही प्रशासनाची तयारी सुरू आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरात पुन्हा वर्दळ वाढली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांना करोना संक्रमणाचा सामना करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन ही केंद्र सुरू केली जाणार आहेत.