पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईक, वकिलांना ताटकळत बाहेर उभे लागते. यामुळे कारागृह प्रशासनाने अत्याधुनिक सुसज्ज सुविधा असणारे प्रतीक्षालय बांधले जाणार आहे. शनिवारी त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
“सायबेज आशा’ ट्रस्टच्या माध्यमातून हे प्रतीक्षालय बांधण्यात येणार आहे. सायबेज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी आणि रितू नथानी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पाडला. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली “सायबेज आशा’ ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपत हे प्रतिक्षालय बांधत आहे.
यावेळी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, उपाधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पी. पी. कदम, एम. एच जगताप, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंदा कांदे, बांधकाम तुरुंगाधिकारी सी. आर. सांगळे, तुरुंगाधिकारी शिवाजी पाटील आणि सायबेज साॅफ्टवेअर कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात विविध खटल्यातील सध्या ६ हजार ७०० बंदी आहेत. या बंद्यांना दररोज भेटायला १,४०० ते १,५०० नातेवाईक आणि वकील येत असतात.