निगडी पोलिसांनी केला 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी (प्रतिनिधी) – हॉटेलमध्ये दिवसा वेटर आणि शहरात रात्री वाहन चोरी करणाऱ्या एकास निगडी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून 13 दुचाकी व दोन मोबाईल असा 10 लाख 90 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दहा गुन्हे उघडकीस आणण्यात निगडी पोलिसांना यश आले आहे.
बुध्ददेव विष्णु बिश्वास (वय 21, रा. दत्तवाडी, आकुर्डी. मुळगांव बौध्दमाना, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर रोजी पोलीस पथक निगडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक रमेश मावसकर यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी बुद्धदेव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली दुचाकी व दोन मोबाईलबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.
यामुळे पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने सदरची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यामुळे पोलिसांनी त्यास अटक करून पोलीस कोठडी घेतली. आरोपी बुद्धदेव याने थरमॅक्स चौकातील विविध हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले आहे. मित्रामुळे तो वाहन चोरीच्या गुन्ह्याकडे वळला. पोलीस कोठडीत असताना त्याने आणखी दुचाकी व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.
पार्किंगमधील ज्या दुचाकींना हॅन्डल लॉक केलेले नाही किंवा हॅन्डल लॉक तोडून तो दुचाकी चोरी करीत असे. पोलिसांनी आत्तापर्यंत त्यांच्याकडून 10 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या 13 दुचाकी व दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. बुद्धदेव याला अटक केल्यामुळे निगडी पोलीस ठाण्यातील पाच, डेक्कन, हिंजवडी, वाकड, सांगवी आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.
पुण्याहून ढकलत आणली दुचाकी
आरोपी बुद्धदेव याने डेक्क्न परिसरातून एक दुचाकी चोरली. मात्र ती सुरू झाली नाही. काही अंतर गेल्यावर दुचाकी सुरू करू, असे म्हणत त्याने काही अंतर दुचाकी ढकलत आणली. मात्र तरीही दुचाकी सुरू झाली नाही. यामुळे त्याने डेक्कन ते निगडी अशी 21 किलोमीटर दुचाकी ढकलत आणली.