वाघोली- लॉकडाऊन असतानादेखील वाघोली परिसरातील नागरिक वारंवार रस्त्यावर बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ते सोमवार दि. 10, 11 व 12 रोजी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय नागरिक व लोकप्रतिनिधींनी एकत्रित घेतला आहे. कोरोना विषाणुवरील गावपातळीवरील सनियंत्रण समिती वाघोली यांच्या सभेमधील निर्णयानुसार व गावामधील किराणा व भाजीपाला विक्रेते यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये शुक्रवार (दि.10), शनिवार (दि.11), रविवार (दि.12) रोजी स्वयंस्फूर्तीने गाव पातळीवर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत मेडिकल, दवाखाने, दूध पुरवठा तसेच पशुसेवा व्यवसाय या सुविधा सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन सर्व किराणा दुकाने आणि भाजीपाला व्यवसायिकांसह इतर सर्वांना करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अचानक निर्णय झाल्याने अनेकांची जीवनावश्यक वस्तूंसाठी गैरसोय झाली होती. त्यामुळे हा बंद एक दिवस पाळून पुन्हा सुरू करण्यात आला. यावेळी मात्र नागरिकांना दोन दिवस अगोदर मुदत देऊन स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा योजनेतील 413 जणांनाच होणार रेशनिंगचे वाटप शासनाकडून पहिल्या टप्प्यात वाघोली गावामधील अन्न सुरक्षा योजने मधील फक्त 413 कुटुंबांना रेशनिंगचे वाटप केले जाणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, रेशनिंग दुकानदार 413 जणांशी संपर्क साधून सोशल डीस्टन्सिंगद्वारे रेशनिंग देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शासनाकडून येणाऱ्या धान्यातून केसरी रेशनिंग कार्ड धारक व इतरांना रेशनिंग मिळणार आहे.