वाघोली (पुणे) – वाडेबोल्हाई हद्दीतील राहू रस्त्यालगत वाघोलीतील कचऱ्याचा भरलेला खासगी डंपर खाली करण्यात आला आहे. याबाबत वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्यावतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे सरपंच दीपक गावडे यांनी यावेळी सांगितले.
मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास वाडेबोल्हाई हद्दीत राहू रस्त्यालगत संपूर्ण कचऱ्याने भरलेला डंपर खाली करण्यात आला आहे. या कचऱ्यामुळे वाडेबोल्हाई परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी अपप्रवृत्तींना वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे. डंपरचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यामातून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो ग्रामपंचायत केसनंदच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
परंतु डंपरमधील कचरा वाघोली परीसरातील कचरा जमा करणाऱ्या स्थानिक कंत्राटदाराने टाकला असण्याची दाट शक्यता आहे. तरी डंपरचा शोध लावून डंपर चालक व कंत्राटदार यांच्यावर वाडेबोल्हाई हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.