Gold-Silver Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; सोन्याचा दर 44 हजाराच्या टप्प्यात..

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घट होत आहे. त्यामुळे भारतीय बाजारात सोने घसरत आहे. आता सोन्याचे दर 44 हजार रुपयांच्या जवळ आले आहेत. काही महिन्यापूर्वी सोन्याचा दर 58 हजार रुपयांपर्यंत गेला होता. गुरुवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर कालच्या तुलनेत 217 रुपयांनी कमी होईल 44 हजार 372 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1 हजार 217 रुपयांनी कमी होऊन 66 हजार 598 रुपये प्रती किलो या पातळीवर गेला.

याबाबत एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत असतानाच भारतीय रुपयाच्या मूल्यात गेल्या काही दिवसांमध्ये बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात सोन्याचे दर कमी आहेत. रुपयाचे मूल्य वाढल्यानंतर सोन्याची आयात स्वस्त होते. परिणामी देशातील बाजारात सोन्याचे दर कमी होतात.

जगातील व्यापार विषयक परिस्थिती वेगाने सुधारत आहे. कारण विविध देशात लसीकरण वेगाने चालू आहे. त्यामुळे सोन्याला आता सेफ हेवन म्हणून कमी भाव मिळत आहे. मात्र डॉलरची मागणी वाढून डॉलर बळकट होत असल्याचे चित्र जागतिक बाजारात निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे असे पटेल म्हणाले.

एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्कात कपात केल्यापासून भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 1,717 डॉलर प्रति औंस व चांदीचे दर 26.09 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.