पुणे : दारुसाठी पैसे मागितल्याने एकाला दांडक्याने बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. संजयकुमार श्रीसूरजप्रसाद चौधरी (वय 28, रा. गाडे वस्ती, वाघोली, मूळ रा. जालोन, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी सागर मोहित (रा. बाजारतळ, वाघोली, नगर रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सागर आणि संजयकुमार दोघे मजुरी करतात. दोघांना दारु पिण्याचे व्यसन आहे. संजयकुमारने त्याला दारुसाठी पैसे मागितले होते. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. सागरने त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या संजयकुमारचा उपचारादरम्यान ससून रूग्णालयात मृत्यू झाला.
संजयकुमारचा बेदम मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले. त्यानंतर आरोपी सागर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे तपास करत आहेत.