मुंबई: डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि आरकेडब्लू डेव्हलपर्सचे प्रवर्तक धीरज वाधवान यांना येस बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी विशेष न्यायालयाने 298 एप्रिलपर्यंत सीबीआयची कोठडी सुनावली आहे. या दोघांना काल (रविवारी) महाबळेश्वर येथून अटक करण्यात आली होती. तिथे या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. येस बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्यासह वाधवन बंधूंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास 50 दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली होती.
वाधवान यांना आज विशेष न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 29 एप्रिलपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राणा कपूर यांनी कपिल वाधवान यांच्या डीएचएफएलला येस बॅंकेतून आर्थिक सहकार्य मिळवून दिले होते. त्याबदल्यात राणा कपूर यांना वाधवान यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अनावश्यक फायदे मिळवून देण्यात आले होते. या परस्पर फायद्याच्या व्यवहारासाठी कपूर आणि वाधवान यांनी मिळून कारस्थान केले होते, असा सीबीआयचा आरोप आहे.