सातारा – पुणे येथील महिला विकास फाउंडेशनच्या वतीने सह्याद्री देवराई, चिंचणेर (विठूचा मळा) येथील वनविभागाच्या पंचवीस एकरांवरील गायरान जागेत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो फळझाडांची लागवड करण्यात आली. निसर्गाचा अविभाज्य घटक असणारे वृक्ष हेच खरे आपले मित्र असल्याचे प्रतिपादन सयाजी शिंदे यांनी यावेळी केले.
सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई व पुणे येथील महिला विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या चिंचणेर (विठूचा मळा) येथील पंचवीस एकर गायरान जागेवर सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या देवराईत दिवसभरात 1800 विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले.
त्यात प्रामुख्याने आंबा, आवळा, चिंच, फणस, लिंबू, जांभूळ आदी फळझाडांची लागवड महिला विकास फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी केली. यावेळी देवराई संकल्पना स्पष्ट करताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, की पुर्वी देवाच्या देवराया असायच्या. येथे लावलेली झाडे तोडायची किंवा नाही हे सर्व गाव मिळून निर्णय घ्यायचे. मात्र आता तशा देवराया राहिल्या नाहीत. त्या आपल्याला तयार करायच्या आहेत.
झाडांपेक्षा कोणीही मोठा नाही. झाडे ही देशाची संपत्ती असून तिचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.यावेळी महिला विकास फाउंडेशनच्या संचालिका पियुषा पवार, सीए अभिजित पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक मिलिंद आहेर, संदीप पाटील, सीए तुकाराम मुठाळ, चिंचणेरचे सरपंच, ग्रामस्थ तसेच सुरेखा आहेर, पूजा पिसे, आरती आनाप, तन्मयी शिंदे, सागर गांगुर्डे, प्रकाश पवार, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच अग्रन, धुळगाव, सांगली या सैनिकांच्या गावचे प्रतिनिधी उपस्थित होते. याठिकाणी पुर्वी 2800 वृक्ष सैनिकांच्या नावाने लावण्यात आले असुन, लावलेल्या प्रत्येक झाडाला कोड स्कॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे स्कॅन केल्यावर सदर झाडाचे खोड, पाने- फुले आदी माहिती मिळते तसेच या झाडांना संरक्षण म्हणून निवडूंग, करवंद, बांबू, मेहंदी, निर्गुडी, घायपात अशा जंगली झाडांचे कुंपण तयार केले आहे. त्यामुळे येथील झाडांचे संवर्धन आणि संगोपन चांगल्या पद्धतीने केले जाते.