पिंपरी – प्रभाग रचना जाहीर झाल्यावर सर्वच इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र काहीजण प्रभागातील नागरिकांचा कौल जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर लिंक तयार करून त्याद्वारे चाचपणी तर करीत आहेतच परंतु सोबत आपल्या समर्थकांच्या माध्यमातून आपण एक संभाव्य विजयी उमेदवार असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
नगरसेवक आणि इच्छुक आपल्याच वॉररुममध्ये मतदानाच्या लिंक तयार करुन स्वत:च्या समर्थकांद्वारे स्वत:ला जास्तीत जास्त मते मिळवून त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी आपल्या समर्थकांना ही लिंक आपल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त व्हायरल करुन आपल्या समर्थनार्थ ऑनलाइन मतदान करुन घेण्याचे आवाहन करत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र करोनाचा वाढता प्रसार आणि ओबीसी आरक्षण यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र निवडणूक आयोगाने प्रकिया सुरू केली असून 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुकांना आपण कोणत्या परिसरातील प्रभागात येत आहोत, याची कल्पना आली. तसेच प्रभाग आरक्षित होणार का, याचीही माहिती मिळाली आहे. मात्र आपल्या प्रभागात दोन महिला उमेदवार आणि एक पुरूष असणार की दोन पुरूष आणि एक महिला असणार हे आगामी काळात समजणार आहे.
प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून इच्छुकांनी ठिकठिकाणी फलक लावून आपणही निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर काहींनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी मतदारांना भेट वस्तू देण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियाच मुख्य अस्त्र
हे सोशल मीडियाचे युग असल्याने आपणच जिंकू शकतो, हा संदेश प्रत्येक मतदाराच्या मोबाइलवर पोहचविण्याचा सध्या आटापिटा सुरू आहे. निवडणुकीच्या या रणसंग्रमात आपल्या पक्षाला किंवा आपल्याला किती पसंती आहे, हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर जनमत चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.
प्रभागात इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी देऊन “तुमच्या पसंतीचा उमेदवार किंवा पक्ष कोणता?’ अशी विचारणा केली जात आहे. प्रत्येकजण आपल्या प्रभागातील नागरिकांना आणि समर्थकांना मतदानाची लिंक पाठवून आपल्याला जास्तीत जास्त मते कशी मिळतील, यासाठी इच्छुक प्रयत्नशील आहेत. यामुळे जनमत तयार होऊन निवडणुकीत याचा फायदा होऊ शकतो, असे इच्छुकांना वाटत आहे.