पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची माहिती प्रत्येक पर्यटकाला मिळावी आणि गडकिल्ले परिसरात राहणाऱ्या युवकांना रोजगार मिळावा, यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून पहिल्यांदाच गडकिल्ले मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी यंदाच्या 2022-23 अंदाजपत्रकामध्ये पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने व कतृत्वाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यात जवळपास एकूण 25 किल्ले आहेत. काही सुस्थितीत तर काही दुरवस्थेत आहेत. शनिवार आणि रविवार किल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी अधिक असते. मात्र, राज्यासह देशभरातून अनेक हौशी पर्यटक किल्ल्यांना भेटी देण्यासाठी दुर्ग भ्रमण करण्यासाठी येत असतात. या पर्यटकांना त्या किल्ल्यांबाबत तेथील इतिहासाबाबत, मावळ्यांच्या पराक्रमाबाबत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते.
मात्र, अनेक किल्ल्यांच्या परिसरात प्रशिक्षित मार्गदर्शक (गाईड) उपलब्ध नसल्याने पर्यटकांना तो आनंद घेता येत नाही. केवळ गडकिल्ल्यांवर येऊन पाहणी करणे आणि ठिकठिकाणी लावलेले बोर्ड पाहून पर्यटकांना परतावे लागते. तेच गाईडच्या माध्यमातून किल्ल्यांच्या इतिहासाबरोबरच किल्ल्यांवरील वैशिष्ट्य याची माहिती देता येईल. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रथमच गडकिल्ले मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटनाचा विकास होईल.