पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 18) सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर, नवीन बिल्डींगच्या बार रूममध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अॅड. पांडुरंग थोरवे व अॅड. हेमंत झंजाड व यांमध्ये लढत होणार आहे. अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सचिव, ऑडीटर पदासाठी मतदान होणार आहे. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी सहा, सचिवच्या दोन जागांसाठी चार तर ऑडीटरच्या एका जागेसाठी तीन जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खजिनदार तसेच कार्यकारिणी सदस्यांची यापुर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. बोगस मतदान टाळण्यासाठी मतपत्रिकेवर होलोग्राम असणार आहे. तो बनविण्यासाठी सात दिवसांचा अवधी लागतो. त्याची झेरॉक्स होत नाही तसेच बनावटही तयार करता येत नाही. मतदानावेळी वकीलवर्गाने ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे, अशी माहिती प्रमुख निवडणूक अधिकारी अॅड. अशोक संकपाळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड. मंगेश लेंडघर यांनी दिली.