पेट्रोपोलीस (ब्राझील) – ब्राझीलमधील पेट्रोपोलीस येथे अतिपावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान 94 जणांचा मृत्यू झाला आहे. डोंगरावरून चिखलाचा अख्खा कडाच गावावर घरंगळत आल्यामुळे पेट्रोपोलीस शहरातील अनेक घरे, कार आणि दुकाने गाडली गेली आहेत. चिखलाखाली गाडल्या गेलेल्यांचा शोध सुरू असून अजूनही कितीजण गाडले गेले आहेत हे सांगता येऊ शकत नाही, असे स्थानिकांनी म्हटले आहे. या दुर्घटनेत किती जण गाडले गेले असावेत, याचा अंदाज देखील पेट्रोपोलीस शहराच्या महापौर रुबेन्स बोम्टेम्पो यांनी वर्तण्यास असमर्थता दर्शवली.
मंगळवारपासून या भागात तुफान पाऊस सुरू आहे. मंगळवारी केवळ 3 तासांतच 25 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या 30 दिवसांत जेवढा पाऊस झाला तेवढा एकाच दिवसात झाला होता, असे रिओ डी जनेरिओचे गव्हर्नर क्लाउडिओ कॅस्ट्रो यांनी सांगितले. त्यामुळेच हे भूस्खलन झाले. रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या शोधकामात अजूनही 35 जण बेपत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संपूर्ण शहरात पूर आणि चिखल साचला आहे. त्यात अडकून पडलेल्या कार ओढून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुरामुळे दोन घरे जमीनदोस्च होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.